जुन्नर (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ जयंती निमित्त जुन्नर शहरात शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. दरवर्षी होणारी मिरवणुक व इतर कार्यक्रम यंदा न झाल्यामुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकावन्न हजार रुपयांचा धनादेश देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दर्शन फुलपगार यांनी दिली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे भान राखत येथील युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह ५० युवकांनी रक्तदान केले.
याप्रसंगी समाजातील गरजू ५० कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अविन फुलपगार, बाळासाहेब सोनवणे, गणेश साळवे, गौरव रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक युवकांनी या महामानवाच्या विविध पुस्तकांचे वाचन करून त्यांना अनोख्य पद्धतीने अभिवादन केल्याचे अमोल गायकवाड यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणातील बाबासाहेबांच्या शिल्पास नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी शहराच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.