बारामती(प्रतिनिधी) : भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न मुळे शहरातील कोरोनची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. गेले सहा दिवसात कोरोनाचा संक्रमित रुग्ण आढळलेला नाही. शहरातील जवळपास 1 लाख 20 हजार नागरिकांचे आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. बारामती करांसाठी ही बाब दिलासादायक असली तरीदेखील कोरोनाचे संकट अध्याप दूर झाले नाही. त्यामुळे भिलवाडा व बारामती पॅटर्न नुसारच कामकाज सुरू राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाचे सहा रुग्ण आढळल्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार भिलवाडा पॅटर्न राबविण्यात आला . भीलवाडा पॅटर्ननुसार बारामती शहर व तालुका सील करण्यात आले. त्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे नियंत्रणात आली. शहर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद करण्यात आली. शहरातील नागरिकांना घरपोच पालेभाज्या पुरवण्याची सुविधा करण्यात आली. त्यानंतर किराणा होम डिलिव्हरी या ॲपच्या माध्यमातून किराणा घरपोच देण्यात येऊ लागला. नागरिकांनीदेखील स्वयंशिस्त पाळली आहे त्यामुळे बारामती शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे .
गेली सहा दिवसांपासून एकही कोरूना रुग्ण वाढला नाही. असे असले तरी धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. आत्तापर्यंत शहरातील 116 व्यक्तींची कोविड19 चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सहा रुग्ण कोरोना संक्रमित निघाले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.106 व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आले आहे.तर 4 जणांचे रिपोर्ट अध्याप आलेले नाहीत असे वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांनी सांगितले.
बारामती शहरात आरोग्य विभागामार्फत नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे त्यानुसार शहरातील जवळपास 1 लाख 20 हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी सांगितले. भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न अवलंबला जात असून त्याद्वारे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जात आहेत. किराणा होम डिलिव्हरी मध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ॲप द्वारे नागरिकांना घरपोच सेवा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये असे आवाहन मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी केले आहे.