दुबई :- ओमानच्या किनाऱ्याजवळ इस्रायलच्या अब्जाधीश उद्योगपतीच्या मालकीच्या तेलाच्या टॅंकरवर ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. इराणबरोबरचा तणाव वाढलेला असताना हा हल्ला झाला आहे.
पॅसिफीक झिरकॉन असे ड्रोन हल्ला झालेल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजाचे नाव असून त्यावर लिबेरियाचा ध्वज होता. हे जहाज सिंगापूरमधील इस्टर्न पॅसिफीक शिपींग कंपनीच्यामाध्यमातून चालवले जात होते. ही कंपनी इस्रायली अब्जाधीश इदान ओफर यांच्या मालकीची आहे.
ओमानच्या किनाऱ्यापासून 240 किलोमीटर अंतरावर असताना या जहाजावर हा ड्रोन हल्ला करण्यात आला, असे कंपनीच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा हल्ला इराणने शाहेद-136 ड्रोनच्या सहाय्याने घडवून आणल्याचा संशय इस्रायली अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
इराणने अशीच ड्रोन रशियाला पुरवली असून युक्रेनविरोधातल्या युद्धात ही ड्रोन वापरली जात आहेत. आतापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र संशय इराणवरच आहे. मात्र इराणने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. संयुक्त राष्ट्रातील इराणच्या दूतावासाने याबाबत त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.