मस्कत – कर्णधार केल कोएत्झर, मॅथ्यू क्रॉस, रिची बॅरिंगटन व जॉर्ज मुनसे या पहिल्या चार प्रमुख फलंदाजांनी केलेल्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर स्कॉटलंडने ओमानवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर स्कॉटलंडने यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या सुपर 12 गटात प्रवेश केला.
ओमानचा डाव 122 धावांवर संपवल्यानंतर विजयासाठी आवश्यक धावा स्कॉटलंडने केवळ 2 गडी गमावून 17 व्या षटकांत पूर्ण करत विजयाची नोंद केली. स्कॉटलंडकडून सलामीवीर जॉर्ज मुनसेने 20 धावा केल्या. मात्र, धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यानंतर सलामीवीर कर्णधार कोएत्झरने 28 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांची बरसात करत 41 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर मात्र मॅथ्यू क्रॉस व रिची बॅरिंगटन यांनी आणखी नुकसान न होऊ देता विजय साकार केला. क्रॉस 26 तर, रिची बॅरिंगटन 31 धावावर नाबाद राहिले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 48 धावांची अखंडीत भागीदारी केली. ओमानकडून फैय्याज बट व कवार अली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
जोश डॅव्ही, सफायन शेरीफ व मायकेल लिक्स यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्कॉटलंडने ओमानसमोर विजयासाठी 123 धावा करण्याचे आव्हान ठेवले. ओमानचा कर्णधार झिशान मक्सुद याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाच्या केवळ 13 धावा असताना त्यांचे दोन फलंदाज बाद झाले होते.
सलामीवीर अकिब इलियास खंबीरपणे खेळत होता. मात्र, त्याला समोरून अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. तो 37 धावा करून बाद झाला. त्याने 35 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकार अशी फटकेबाजी केली. त्यानंतर महंमद नदीम व कर्णधार झिशान मक्सूद यांनी संघाला शतकी धावसंख्या पार करून दिली. नदीम 25 धावांवर बाद झाल्यानंतर मक्सुदने 30 चेंडूत 3 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. स्कॉटलंडकडून जोश डॅव्हीने 3 बळी घेतले. त्याला सुरेख साथ देताना सफायन शेरीफ व मायकेल लिक्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मार्क वॅटने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ओमान – 20 षटकांत सर्वबाद 122 धावा. (अकिब इलियास 37, झिशान मक्सुद 34, महंमद नदीम 25, जोश डॅव्ही 3-25, मायकेल लिक्स 2-13, सफायन शेरीफ 2-25, मार्क वॅट 1-23). स्कॉटलंड – 17 षटकांत 2 बाद 123 धावा. (केल कोएत्झर 41, जॉर्ज मुनसे 20, रिची बॅरिंगटन नाबाद 31, मॅथ्यू क्रॉस नाबाद 26, फैय्याज बट 1-26, कवार अली 1-27).