शारजा –आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य दिल्ली कॅपिटल्स संघाशी राजस्थान रॉयल्सचा सामना होत आहे. या सामन्यात दिल्लीच्या भक्कम फलंदाजीला रोखण्याचे मोठे आव्हान राजस्थानसमोर उभे ठाकले आहे.
पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शेमरन हेटमायर व मार्कस स्टोनिस अशी भक्कम फलंदाजी दिल्लीकडे आहे. त्यांनी सातत्याने यंदाच्या स्पर्धेत अव्वल कामगिरी केली आहे. धवन, अय्यर व हेटमायर यांना स्थिरावल्यानंतर मोठी खेळी करण्यात जरी अपयश आले असले तरी त्यांनी संघाच्या विजयात आपला मोलाचा वाटा घेतला आहे. त्यांच्या फलंदाजीसह गोलंदाजी देखील अत्यंत भेदक आहे.
कागिसो रबाडा, अनरिच नोर्जे, रवीचंद्रन अश्विन, अमित मिश्रा अशी सार्थ गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. त्यांना मिश्रा दुखापतीने जायबंदी झाल्याने एका फिरकी गोलंदाजाची उणीव निश्चितच जाणवणार आहे. मात्र, त्यांचा सेकंड बेंचही सशक्त आहे. त्यात इशांत शर्मा हा सर्वात अनुभवी गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहे. तसेच अविश खानही नवोदित गुणवान गोलंदाज असून त्याला या स्पर्धेतील सामन्यांत मिळालेल्या संधीचा त्याने लाभही घेतला आहे. या सामन्याबाबत बोलायचे झाले तर त्यांना हेटमायर व धवन यांच्या अपयशाची चिंता आहे.
राजस्थान संघाचे संजू सॅमसन, कर्णधार स्टिव्ह स्मिथ व रियान पराग हे अत्यंत भरात आहेत. त्यातही सॅमसन याचा धसका तर या स्पर्धेतील सर्वच संघांनी घेतला आहे. त्याला कसे रोखायचे हाच मोठा प्रश्न दिल्लीसमोर राहणार आहे. तसेच राहुल तेवतियाने पहिल्या काही सामन्यांत चमक दाखवली असली तरीही त्याला नंतर त्यात सातत्य राखता आलेले नाही.
जोफ्रा आर्चरने तळात फलंदाजी करत चौकार व षटकारांची आतषबाजी केली असल्याने अखेरच्या षटकांत त्यांनी जवळपास 15 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. याच डेथ ओव्हर्समध्ये राजस्थानच्या धावसंख्येवर अंकूश ठेवण्यात दिल्लीला यश आले तर त्यांना हा सामना सोपा ठरेल, अन्यथा त्यांना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल.
दिल्लीची गोलंदाजी काहीशी अननुभवी आहे व त्याचा लाभ राजस्थानचे फलंदाज निश्चितच उठवू शकतात. जोफ्रा आर्चर व श्रेयस गोपाल वगळता त्यांच्या जयदेव उनाडकट, रियान पराग व टॉम कुरेन यांना आलेले अपयश या सामन्यात तरी पुसले जाणार का, हा प्रश्न दिल्लीसमोर आहे. त्यांना सॅमसन आणि कंपनीला रोखता आले तरच त्यांना विजयाची संधी राहणार आहे.
स्टोनिस निर्णायक ठरेल
दिल्ली संघात मार्कस स्टोनिस हे ट्रम्प कार्ड ठरत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये त्यानेच सर्वात जास्त सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीत तर वर्चस्व राखलेच आहे, पण गोलंदाजीतही त्याने सर्वोत्तम कामगिरी सिद्ध केली आहे. दिल्लीचा विजय व पराभव यांतील फरक स्टोनिसच दूर करणार आहे. त्यामुळे याही सामन्यात त्याचीच कामगिरी निर्णायक ठरणार आहे.