IPL 2024 (Delhi Capitals vs Rajasthan Royals, Match 56) : आयपीएल 2024 स्पर्धेचा 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात आज (मंगळवार, 7 मे ) नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
आयपीएल 2024 च्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये राजस्थानने शानदार खेळ केला आहे आणि त्याचा संघ मजबूत स्थितीत व गुणतालिकेत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्याचवेळी दिल्लीही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असून पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. गेल्या वेळी हंगामातील 9व्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने 12 धावांनी विजय मिळवला होता. आज दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय आवश्यक आहे.
दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये पाच विजय आणि सहा पराभवांमुळे 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. संघाची सुरुवात खराब झाली, तरीही ते प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या शर्यतीत आहेत. गेल्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सात गडी राखून पराभूत झाला होता. अशा स्थितीत संपूर्ण दिल्ली संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय मिळवून गुणतालिकेत पुढे जायचे आहे.
दुसरीकडे, राजस्थान दहा सामन्यांतून आठ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानने यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाला दिल्लीविरुद्ध जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवायचे आहे.
दरम्यान, दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 28 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने 15 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने 13 सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ती फलंदाजांसाठी अनुकूल आहे. कारण येथील खेळपट्टी सपाट असल्यामुळे चेंडू थेट बॅटवर येतो. येथे गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही परंतु सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना अचूक गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून ते विरोधी संघाला बचावात्मक धावसंख्येपर्यंत रोखू शकतील.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी
सामन्यात नक्कीच षटकार आणि चौकारांचा पाऊस पडू शकतो, कारण दिल्लीचे मैदान खूपच लहान आहे. आकडेवारीवर विश्वास ठेवला तर या खेळपट्टीवर धावांची सरासरी 190 धावा आहे आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे अधिक यश मिळवले आहे. दव घटकही सामन्यात पाहायला मिळतो. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणे योग्य ठरेल.