नवी दिल्ली :– भारतातील सर्वांत लोकप्रिय प्रिमिअर लीग अर्थात इंडियन प्रिमिअर लीग-२०२४ चा (आयपीएल) लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. आयपीएल लिलावापूर्वी सर्व संघांना त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयकडे सादर करावी लागणार आहे. यासाठी २६ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे.
म्हणजेच, या तारखेपर्यंत सर्व संघांना त्यांच्या कायम आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी अंतिम करावी लागेल. मात्र या लिलावापूर्वी अनेक बडे खेळाडू सोडले जाऊ शकतात. तसेच, हे खेळाडू लिलावात न विकलेले(अनसोल्ड) राहू शकतात, म्हणजेच त्यांना खरेदी करण्यात कोणताही संघ रस दाखविणार नाही. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.
जो रूट
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. पण राजस्थान रॉयल्स जो रूटला सोडू शकते असे मानले जात आहे. त्याचवेळी, जर जो रूट लिलावाचा भाग असेल तर कदाचित इंग्लंडच्या माजी कर्णधारावर कोणताही संघ बाजी लावताणा दिसणार नाही, जर असे झाले तर जो रूट लिलावात अनसोल्ड राहू शकतो.
सर्फराज खान
दिल्ली कॅपिटल्सने सर्फराज खानला सोडले आहे. अशा प्रकारे सरफराज खान लिलावाचा भाग असेल. मात्र, आता संघ सरफराज खानमध्ये रस दाखवतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दासुन शनाका
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका गुजरात टायटन्सचा भाग आहे. पण गुजरात टायटन्स दासून शनाकाला सोडू शकते, असे मानले जात आहे. यानंतर दासुन शनाका लिलावात जाईल. मात्र यंदा त्याच्याकडे फ्रँचायजींचे दुर्लेक्ष होण्याची शक्यता आहे.
शाकिब अल हसन
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन हा कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. शाकिब अल हसन नुकताच जखमी झाला होता. त्याचबरोबर आता कोलकाता नाईट रायडर्स शाकिब अल हसनला सोडू शकते. वास्तविक, शाकिब अल हसनची अलीकडची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. अशा परिस्थितीत शाकिब अल हसन लिलावात दुर्लेक्षीत राहू शकतो.
IPL 2024 Auction : ‘हा’ 23 वर्षीय खेळाडू ठरू शकतो IPL इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर…
ख्रिस जॉर्डन
गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डनचा त्यांच्या जागी संघात समावेश केला होता, मात्र आता ख्रिस जॉर्डनला सोडण्यात येऊ शकते. अशाप्रकारे, जर ख्रिस जॉर्डनला लिलावात खरेदीदार सापडला नाही तर तो अनसोल्ड राहू शकतो.