IPL 2024 Auction : विश्वचषक संपल्यानंतर आयपीएलबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, मात्र आयपीएलमध्येही वर्ल्डकपचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. वास्तविक, आयपीएलच्या पुढील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल 2024 साठी लिलाव दुबईमध्ये 19 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जाईल. या लिलावात या वनडे विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावली जाऊ शकते. त्यापैकी एक युवा खेळाडू आहे जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो.
IPL मधील सर्वात महागडा खेळाडू कोण..?
आयपीएलमध्ये आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन (Sam Curran) आहे, ज्याला आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. इंग्लंडच्या या युवा खेळाडूने 2022 च्या T20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती, त्यामुळे पंजाब किंग्जने त्याला मोठी बोली लावून खरेदी केले. मात्र आयपीएलच्या या मोसमात सॅम करनला फारशी कामगिरी करता आली नाही.
आता पुढील आयपीएल हंगामाच्या लिलावात न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) सॅम करनचा विक्रम मागे टाकत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो.
23 वर्षीय रचिन रवींद्रने केलं सर्वांना प्रभावित…
न्यूझीलंडच्या या अवघ्या 23 वर्षीय खेळाडूने विश्वचषकात आपल्या शानदार कामगिरीने तमाम क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले आहे. रचिन रवींद्र हा न्यूझीलंडकडून पहिल्या वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने फक्त 10 सामन्यात 64.22 च्या सरासरीने आणि 106.44 च्या स्ट्राईक रेटने एकूण 578 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. रचिन हा अष्टपैलू खेळाडू आहे जो फलंदाजीसोबतच फिरकी गोलंदाजीही करतो. रचिनने वर्ल्ड कपमध्ये 5.98 च्या इकॉनॉमी रेटने 9 विकेट्सही घेतल्या आहेत.
रचिनला विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळपट्ट्यावर आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना कोणतीही अडचण आली नाही. या सर्व बाबी पाहता रचिन रवींद्र हा आयपीएल संघाचा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो, असे दिसते.