बीड – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझ्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकार आता दुसऱ्यांदा घडला आहे. ते मराठा आंदोलक असू शकत नाहीत. कारण आंदोलक हे कायम चर्चा करण्यासाठी तयार असतात. मात्र, कालचा प्रकार हा प्रायोजित होता, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलकांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना प्रचारादरम्यान मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
मी कोणत्याही समाजाचा द्वेष केला नाही. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण नक्की मिळेल, असा शब्द मी मराठा बांधवांना दिला आहे. मात्र, वारंवार असे प्रकार घडत असल्याने मी भावुक झाले असल्याचे पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 40 उमेदवार आहेत. हे सर्वच उमेदवार प्रचारासाठी फिरत आहेत. मात्र तरी देखील हा अनुभव माझ्याच वाटेला का? असा प्रतिप्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये असे कधीच झाले नव्हते, असे देखील त्या म्हणाल्या. मी कोणत्याही घटनेचा फायदा घेऊन कोणत्याही समाजाला जवळ करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
मात्र, जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माझा ताफा अडवला जातो, त्यामध्ये 14 ते 15 वर्षांची लहान मुले असतात. ते पाहून मन भाऊक होते. मुलांमध्ये जातीपातीची लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.