दुबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठीचा लिलाव आता अत्यंत चर्चेत येत आहे. यंदाच्या लिलावात न्यूझीलंडचा नवोदित स्टार फलंदाज राचिन रवींद्र हा सर्वात महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. हा लिलाव येत्या 19 डिसेंबरला होणार आहे. भारतातील एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर लगेचच आयपीएल स्पर्धेच्या लिलावाची चर्चा सुरू झाली.
आयपीएलमध्ये आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेन ठरला होता. त्याला यंदाच्या वर्षी पंजाब किंग्जने तब्बल 18.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. इंग्लंडच्या या युवा खेळाडूने 2022 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती, त्यामुळे पंजाब किंग्जने त्याला मोठी बोली लावून खरेदी केले. मात्र आयपीएलच्या या मोसमात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
राचिन रवींद्र ठरेल सर्वात महागडा
आता पुढील आयपीएल हंगामाच्या लिलावात न्यूझीलंडचा युवा खेळाडू राचिन रवींद्र त्याचा विक्रम मागे टाकत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. न्यूझीलंडच्या या अवघ्या 23 वर्षीय खेळाडूने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत शानदार कामगिरीने तमाम क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले आहे. राचिन रवींद्र हा न्यूझीलंडकडून पहिल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 10 सामन्यात 64.22 च्या सरासरीने आणि 106.44 च्या स्ट्राईक रेटने एकूण 578 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतकेही फटकावली आहेत.
लक्षवेधी…
– पुढील आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबरला दुबईत
– इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर स्पर्धेला प्रारंभ
– मार्च महिन्यात अपेक्षित
– विश्वकरंडकात चमकलेले खेळाडू खाणार भाव
– राचिन रवींद्र ठरेल सर्वात महागडा
– रवींद्रसह हेड, कमिन्सही हॉट फेव्हरीट
– मिचेल स्टार्क, डॅरेल मिशेलवरही लक्ष
– महिलांच्या आयपीएल स्पर्धेबाबतही लिलाव
– 9 डिसेंबरला मुंबईत लागणार जंगी बोली
राचिन हा अष्टपैलू खेळाडू आहे जो फलंदाजीसोबतच फिरकी गोलंदाजीही करतो. राचिनने यंदाच्या स्पर्धेत 5.98 च्या सर्वात कमी सरासरीने 9 बळीही घेतले आहेत. राचिनला विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय खेळपट्ट्यांवर आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना कोणतीही अडचण आली नाही. या सर्व गोष्टी पाहता राचिन हा पुढील आयपीएल स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो.
Team India : मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड करार वाढवण्यास अनुत्सूक; एनसीएमध्ये कार्यरत राहण्यात रस…#TeamIndia #BCCI #HeadCoach #SachinTendulkar#VirenderSehwag #RahulDravid #MSDhoni pic.twitter.com/Hd0Z0rHfdi
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 24, 2023
अफगाणिस्तानच्या खेळाडूंवरही लक्ष
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यांचा अनुभव कमी पडला अन्यथा त्यांनी उपांत्य फेरीत निश्चितच स्थान मिळवले असते. त्यांचे रशीद खानसारखे काही खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळतच आहेत मात्र, आता त्यांचा इब्राहिम झद्रान, रेहमत शाह, रेहमनुल्लाह गुरबाज, अजमतुल्ला ओमरझाई यांनाही पुढील आयपीएल स्पर्धेपूर्वी होत असलेल्या लिलावात आपल्या संघात खरेदी करण्यासाठी सर्व संघांमध्ये चांगली चुरस रंगेल अशी अपेक्षा आहे.