पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिंदे गट-भाजप सरकारमधील राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना टिका केली होती. अब्दुल सत्तार हे मंत्री आहेत, संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारची भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अशोभनीय आहे. हा संपूर्ण महिला भगिनींचा अपमान आहे. याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य जनता, महिलांमध्येही रोष आहे, अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती, याचे पडसाद आज उपनगरांत उमटले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठिकठिकाणी तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी अब्दुल सत्तार यांचा राजीनामा सरकारने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सहभागी झाले होते. अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली असली तरी ती जाहीररित्या मागावी, त्यांनी राजीनाम द्यावा, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठाम आहेत. याबाबत महिला आरोगानेही दखल घेत सत्तार यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत, असे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
बालाजीनगरमध्ये सत्तारांविरोधात घोषणाबाजी
धनकवडी, दि. 8 (प्रतिनिधी) -शिंदे गट-भाजप सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल स्वारगेट सातारा रस्ता येथे सकाळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या नेतृत्त्वाखाली बालाजी नगर येथील एलोरा पॅलेसजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकत्यांनी सत्तार यांचा निषेध करीत सत्तार यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत घोषणा देत, विरोध प्रदर्शन करीत आंदोलन करण्यात आले.
या निषेध आंदोलनांमध्ये बालाजीनगर परिसरातील महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. संतप्त महिलांनी सत्तार यांच्या फोटोला चपलांच्या जोडे मारले. सहकारनगर पोलीस स्टेशन मार्फत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी माझी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रेय धनकवडे म्हणाले की, शिंदे गट-भाजप सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा. महाराष्ट्र राज्य महिलांचा सन्मान करणारे आहे. परंतु, सत्तार हे कायमच महिलांचा अपमान करीत आहेत. त्यामुळे त्यांचा आज जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे , विजय आप्पा रेणुसे, गौरव घुले, सागर भागवत, मिलिंद पन्हाळकर, राजेंद्र बर्गे, वैशाली खुटवड, मनीषा जाधव, मीना पांचाळ व इतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्रिमूर्ती चौक विरोधी घोषणांनी दणाणला
कात्रज, दि. 8 (प्रतिनिधी) -कात्रज, आंबेगाव, भारती विद्यापीठ, धनकवडी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धनकवडी परिसरातील भारती विद्यापीठ मागील गेट रस्त्यावर त्रिमूर्ती चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे गट – भाजप सरकार तसेच राज्यमंत्री सत्तार यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
त्रिमूर्ती चौकात जाहीर निषेध आंदोलन बुधवारी सकाळी 10:30 वाजता करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक युवराज बेलदरे, बाळा धनकवडे, संतोष फरांदे, चेतन मांगडे, नाना जगताप व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गद्दार सरकार मधील मंत्र्यांकडून वारंवार अशा पद्धतीने महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये होत आहेत, त्यांना कोणतेही भान राहिलेले नाही, असे युवराज बेलदरे यांनी सांगितले. महाराष्ट्राचा एकच गद्दार, अब्दुल सत्त्तार, अब्दुल सत्तार…, सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या. यावेळी त्रिमूर्ती चौकामध्ये भारती विद्यापीठ पोलीस प्रशासनामार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
बिबवेवाडी, दि. 8 (प्रतिनिधी) -राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी झोन-2च्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, प्रिया गदादे, दिनेश खराडे, बाळासाहेब अटल, प्रविण सोनी, सुशांत ढमढेरे, अमोल ननावरे, नामदेव पवार, समीर पवार, योगेश पवार, अभिजीत बारवकर, शंकर सहाणे, राहुल गुंड, सतीश धर्मावत, योगेश रणदिवे, महेश कुंभार, सचिन पासलकर, श्रीकांत स्वामी, वैभव डोळस, आशिष कांबळे, प्रतीक कोंडे, अमोल शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.