इंदूर :- भारतासारख्या देशात क्रिकेट खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही. येथे धावा केल्या तर आत्मविश्वास तर मिळतोच, परंतू भारतीय संघाच्या जागतिक कीर्तिच्या फिरकी गोलंदाजीसमोर मोठी खेळी करणे एक खेळाडू म्हणून प्रत्येकासाठी अभिमानास्पद असते, असे मत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने व्यक्त केले आहे.
आम्ही भारतात येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होतो. त्या मालिकेत आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. यातूनही बरेच काही शिकलो. मात्र, आता आगामी विश्वकरंडक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवत भारताविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवणे आमच्यासाठी महत्त्वाचे बनले आहे. भारतीय संघ सध्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आशिया करंडक स्पर्धा जिंकली आहे. त्यांचे सर्वच खेळाडू भरात आहेत, अशा संघाविरुद्ध खेळतानाच आपली गुणवत्ता सिद्ध होते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात माझ्याकडून मोठी खेळी झाली नाही. मात्र, तरीही जो वेळ खेळपट्टीवर घालवला, त्यामुळे यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय खेळपट्ट्यांवर कसे खेळले पाहीजे, याचा प्रत्यय आला, असे स्मिथ म्हणाला.
आमचे अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळतात, त्यामुळे त्यांना येथे खेळण्याचा चांगला अनुभव आहे. या मालिकेतूनच आम्ही आगामी विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करणार आहोत. भारतीय वेगवान गोलंदाजांचीदेखील सध्याची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी मानली जात आहे. तसेच त्यांची फिरकी गोलंदाजी तर पहिल्यापासूनच भेदक आहे. अशा गोलंदाजीसमोर मोठी खेळी करणे एक फलंदाज म्हणून प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरते, असेही स्मिथ म्हणाला.
मॅक्सवेल ट्रम्पकार्ड ठरेल…
आगामी विश्वकरंडक स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेल हाच ट्रम्पकार्ड ठरेल, असे स्मिथने सांगितले आहे. मॅक्सवेलकडे आयपीएल खेळण्याचा सर्वात जास्त अनुभव आहे. त्याने भारतातील प्रत्येक मैदानावर सरस व सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला विश्वकरंडक स्पर्धेत मोठा लाभ होणार आहे, असेही स्मिथ म्हणाला.