नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान अत्यंत घातक एमक्यु-9बी रीपर ड्रोनचा करार होणार आहे. या ड्रोनला हंटर किलर ड्रोन असेही म्हणतात.
गेल्या वर्षी 31 जुलै रोजी अमेरिकेने तत्कालीन अल कायदा प्रमुख अल जवाहिरीची काबूलमध्ये हत्या केली होती. हा हल्ला इतका अचूक होता की जवाहिरीखेरीज त्या इमारतीतील इतर कोणीही मारले गेले नाही. हे संपूर्ण ऑपरेशन याच किलर ड्रोनने केले आहे. त्यामुळेच चीन आणि पाकिस्तानसोबतचे ताणले गेलेले संबंध पाहता भारताने हे अनोखे ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या या डीलमध्ये भारताला 30 एमक्यु-9बी रीपर ड्रोन मिळतील, त्यापैकी 14 ड्रोन भारतीय नौदलाला आणि प्रत्येकी आठ ड्रोन लष्कर आणि हवाई दलाला दिले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांत सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि संरक्षण तज्ज्ञ याकडे गेम चेंजर म्हणून पाहत आहेत.
‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या बातमीनुसार, अमेरिकेने या आधुनिक ड्रोनचा वापर तालिबान आणि इसिस विरोधात केला होता. हे रीपर ड्रोन यूएस आर्मीच्या हवाई ताफ्यातील एक अतिशय खास भाग आहे, जो पाळत ठेवणे आणि हल्ला करणे या दोन्ही हेतूंसाठी वापरला जातो.
या ड्रोनची गरज दुसऱ्या दृष्टिकोनातूनही समजा
* भारताला 7,517 किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे
* चीनसोबत 4,056 किमीची नियंत्रण रेषा
* पाकिस्तानसोबत 3,323 किमी प्रत्यक्ष ताबा रेषा
* नेपाळसोबत 1,752 किमीची सीमा
* म्यानमारसोबत 1,645 किमीची सीमा
अशा परिस्थितीत शेजारील देशांच्या डोळ्यात धूळफेक करताना रियल टाईम मॉनिटरिंग करू शकणाऱ्या अशा टेहळणी विमानाची गरज आहे.
एमक्यु-9बी रीपर ड्रोन ही गरज चांगल्या प्रकारे पूर्ण करतात. ते जमिनीवर दोन पायलट आणि सेन्सर ऑपरेटरच्या टीमद्वारे रिमोटने उडवले जातात. पायलट टेकऑफ, फ्लाइट मार्ग आणि लॅंडिंग नियंत्रित करतो, तर सेन्सर ऑपरेटर कॅमेरे आणि पाळत ठेवणारी उपकरणे नियंत्रित करतात. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत सरकारला ते देशात बनवायचे होते, पण अमेरिकेला ते लवकरात लवकर विकायचे होते. चीनची वाढती आक्रमकता आणि चीनकडून पाकिस्तानला दिले जाणारे ड्रोन पाहता भारताने या कराराला मंजुरी दिली.