नवी दिल्ली – भारताच्या पुरुष फुटबॉल संघाने सॅफ फुटबॉल स्पर्धेत नेपाळचा 1-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू सुनील छेत्री याने संपूर्ण सामन्यात एकमेव गोल नोंदवताना एक अनोखी कामगिरी केली. त्याने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या गोलची बरोबरी करताना 77 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला.
छेत्रीने पहिल्या हाफमध्येही अनेकदा गोल करण्याचे प्रयत्न केले मात्र, त्याला यश आले नाही. पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत संपला. दुसरा हाफ सुरु झाल्यावर छेत्रीने आपली आक्रमकता आणखी वाढवली व त्यानेच सामन्याला कलाटणी मिळाली. नेपाळचा बचाव भेदताना छेत्रीने आपला 77 वा आंतरराष्ट्रीय गोल केला.
या कामगिरीसह त्याने पेलेच्या विक्रमाची बरोबरीही केली असून आता या स्पर्धेतील पुढील लढतींत त्याने आणखी एक गोल केला तर तो पेलेंच्या कामगिरीला मागे टाकेल. छेत्रीचा हा 123 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. पेलेंची बरोबरी केली असली तरीही त्यासाठी छेत्रीला त्यासाठी जास्त सामने खेळावे लागले. पेले यांनी ही कामगिरी 92 सामन्यात केली आहे.
या गोलच्या जोरावर आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक गोल केलेल्या खेळाडूंच्या यादीत छेत्रीने तिसरे स्थान पटकावले आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रोनाल्डोने 112 तर मेस्सीने 69 गोल केले आहेत. अमिरातीच्या अली मबखतच्या 77 गोलचीही छेत्रीने बरोबरी केली आहे. या स्पर्धेचे सात वेळा विजेतेपद मिळवलेला भारतीय संघ या स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
या स्पर्धेत या सामन्यापूर्वी भारताने 3 सामने खेळले असून त्यात एकूण 5 गुण मिळवले आहेत. मालदीव व नेपाळने देखील प्रत्येकी 3 सामने खेळताना 6 गुणांची कमाई केली आहे. आता जर भारतीय संघाला अंतिम फेरीसाठी पात्र व्हायचे असेल तर त्यांना बुधवारी मालदीवविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीत विजय मिळवावा लागणार आहे.