सातारा – सातारा शहर व उपनगरामध्ये गेल्या 24 तासांत करोनाचे नऊ बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक बनू लागला आहे. शहरामध्ये गेल्या आठवडाभरात बाधितांची संख्या पाऊणशेच्या नजीक येऊन पोहचली आहे.
सातारा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्येही रुग्णांची संख्या वाढती आहे. राधिका रोड, रविवार पेठ, यादोगोपाळ पेठ हे शहरातील भाग सातत्याने कंटेनमेंट झोनमध्ये येत असल्याने येथील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. आरोग्य विभागाकडून सोमवारी रात्री उशिरा आधी 67 नंतर 24 अशा दोन याद्या प्राप्त झाल्या. एकूण 91 रुग्णांपैकी सातारा तालुक्यात 23 रुग्ण वाढले. त्यापैकी सातारा शहर व उपनगरांमध्ये नऊ रुग्ण आढळले.
यापूर्वी बुधवार नाका या जाहीर झालेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला व एक बालिका यांना निकट सहवासामुळे करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. चार भिंतीच्या पिछाडीला असणाऱ्या मंगळाई कॉलनीत तिघांना करोनाची बाधा झाली. त्यातील एकाने मुंबईची वारी केल्याची माहिती आहे. यादोगोपाळ पेठेतील एक जण व शाहुपुरी ग्रामपंचायत क्षेत्रातील भैरोबाचा पायथा येथील एकाला करोनाची बाधा झाल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
शाहूनगर रेणुका हाउसिंग सोसायटीत 30 वर्षीय युवकाला करोनाची बाधा झाल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागात झाली. पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास, योग्य काळजीचा अभाव आणि निकटचा संपर्क यामुळे शहरातही काही पेठांची हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू झाली आहे. बुधवार पेठ, शाहूनगर व यादोगोपाळ पेठ हे तीन भाग यापूर्वीच कंटेनमेंट झोन जाहीर झाले आहेत. शेटे चौकातील परिसर काल कंटेनमेंट झोन जाहीर झाला आहे.
आजपासून इन्फ्लुएंझा व “सारी’चे सर्वेक्षण
सातारा शहरामधील करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. संक्रमणाचा हा धोका ओळखून पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेतली.
एनएआरएचएम प्रशिक्षित हेल्थ वर्कर यांचा समावेश असणाऱ्या वीस जणांच्या पथकाकडून सातारा शहरात इन्फ्लुएंझा व सारीची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा सर्वे सुरू करण्यात येणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रवास व सामायिक अंतर यांचे गणित आता सातारकरांना सांभाळावे लागणार आहे.