सातारा – करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कण्हेर (ता. सातारा) गावासह परिसरातील लोक धास्तावले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यामार्फत कण्हेरमधील घरोघरी जाऊन नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग आणि इतर तपासणी करण्यात आली.
कण्हेर गाव व वस्तीसह अंतर्गत गावांमध्ये तपासणीसह सर्व्हे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी व शरीराचे तापमान तपासण्यात येत आहे.
सोमवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शनकुमार मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका रेखा करंजकर, कल्पना मोरे, विजया धाराशिवकर, अनुराधा चांगण, शारदा सुतार, आशा सेविका सोनाली मोकाशी, मनीषा वाघमळे यांनी ग्रामस्थांचा सर्व्हे करून तपासणी केली. कण्हेर येथील विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांचे करोना अहवाल प्रलंबित आहेत. यामुळे गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून ग्रामदक्षता समितीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामसेवक बाळकृष्ण सावंत यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात करोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोजर मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. कण्हेरमध्येही करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.