नगर – पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाला महिला शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न चांगलाच भोवला आहे. एका महिला शिक्षिकेशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात त्या प्रभारी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीर दखल घेऊन “त्या’ प्रभारी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली.
विजय तुळजाराम अकोलकर असे निलंबित झालेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. अकोलकर हे खांडगाव (ता. पाथर्डी) येथील शाळेचे उपमुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. मुख्याध्यापकाची जागा रिक्त असल्याने त्यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
त्यांच्या विरोधात फिर्यादी महिलेने यापूर्वी देखील त्रास दिले जात असल्याची तक्रार केली होती.मात्र प्रभारी मुख्याध्यापक विजय अकोलकर यांनी त्या महिला शिक्षिकेशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात पिडीत शिक्षिकेने 15 ऑक्टोबर रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी शिक्षण विभागाला पत्र काढून “त्या’ प्रभारी मुख्याध्यापकाच्या निलंबनाचे आदेश काढले आहे. तर त्यांची अकोले पंचायत समिती मुख्यालय येथे नेमणूक करण्यात आली आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.