महादेव जाधव
फुरसुंगी – सासवड मार्गालगत हडपसर व फुरसुंगी गावांच्या सीमेवर काळेपडळ येथील टेकडीवर तुकाई मातेचे स्वंयभू जागृत मंदिर आहे. नवरात्र उत्सवामुळे पहाटेपासुनच मंदिरामध्ये पुजा-अर्चा सुरू असते. दररोज, अंदाजे 15 हजार भाविकांच्या उपस्थितीत टेकडी फुलुन जात आहे. दसऱ्याच्यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करुन सीमोल्लंघन केले जाते.
धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रम राबवून बांधिलकी जपण्याचे कामही मंदिर देवस्थान समिती करीत असल्याचे तसेच मूळ पुरातन कामाला धक्का न लावता मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू असल्याचे देवस्थान समितीचे सचिव सागर तुपे यांनी सांगितले. यावेळी समितीचे अध्यक्ष हिरामण तुपे, उपाध्यक्ष डॉ. सुनिल मालुसरे, सचिव सागर तुपे, सदस्य कपिल काळे उपस्थित आहेत.
तुकाई नावाची आख्यायिका..
रामायण काळात सीतेचे अपहरण झाल्यावर राम वेडेपिसे होऊन सर्वत्र सीतामातेचा शोध घेऊ लागले. त्यावेळी माता पार्वतीला रामाचे दुःख पाहवले नाही. त्यामुळे पार्वती माता सीतेचा अवतार धारण करून रामासमोर आल्या. मात्र, रामाने क्षणार्धात ओळखले, ही माता पार्वती आहे व ते म्हणाले, तु का आली माई? याचाच पुढे अपभ्रश होऊन तुकाई हे नाव पडले, अशी मंदिराबाबतची पौराणिक आख्यायिका येथील पुजारी सांगतात.
हेमांडपंथी मंदिर…
मंदिरातील गाभाऱ्याची मांडणी हेमाडपंथी पुरातन शैलीतील आहे. मंदिराचा मुख्य गाभारा पूर्णपणे दगडी आहे. गाभाऱ्यासमोरच एक प्रचंड मोठी दगडी शिळा आहे. ही शिळा या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. गोलाकार आकाराची ही शिळा देवीचे आसनस्थान आहे, असे मानले जाते. मंदिर परिसरात विविध देवी-देवतांची,संतांची मंदिरे आहेत. मंदिराचा कळस 21 फूट उंच आहे.