Salman Khan| बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आल्याचे घटनेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा तपास सुरू करत सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यानंतर या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
अटकेत असलेल्या चार आरोपींपैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने 25 एप्रिल रोजीसोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनुज थापन याने आज तुरुंगात चादरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
तर विकास गुप्ता व सागर पाल या आरोपींनी चार लाख रुपयांमध्ये गोळीबाराची सुपारी घेतली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सुरतजवळ तापी नदीतून गोळीबारासाठी वापरलेल्या बंदुका जप्त केल्या होत्या.
नेमकं काय घडलं होत?
14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली आहे.