पिंपरी (संगीता कांबळे ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरच्या रस्त्यावर मेट्रोच्या पुलाखाली दुचाकी, चारचाकी वाहने पार्क केली जातात. महापालिकेत कामानिमित्त येणारे ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, पक्षाचे नेते, सामान्य नागरिक यांची वाहनेही महापालिकेच्या बाहेर पडणा-या रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे महापालिकेसमोरच बेकायदा वाहने उभी केली जात असतील, तर जाब कुणाला विचारायचा? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीमध्ये शहर आणि उपनगरांमधून विविध कामानिमित्त रोजच मोठ्या प्रमाणात करदाते, नागरिक येत असतात. तसेच महापालिकेचे कर्मचारी, भेट देण्यासाठी येणारी अस्थापने, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, राजकीय नेते, कार्यकर्ते यांची संख्या मोठी आहे. ठराविक मान्यवरांसाठी येथे पार्किंग राखीव आहे. मात्र, ते अपुरे पडत असल्याने व येणा-यांची संख्या वाढत असल्याने नागरिक महापालिकेसमोरच असलेल्या मेट्रोच्या पुलाखाली वाहने उभी करतात. त्यामुळे सोसायट्यांना पुरेशी पार्किंग सुविधा देणे बंधनकारक आहे, असा नियम करणा-या महापालिकेची अपुरी पार्किंग व्यवस्था कधी सुधारणार असाही प्रश्न विचारला जात आहे.
सार्वजनिक वाहन व्यवस्था अपुरी
शहरातील लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक सण, उत्सवच्या मुहूर्तावर वाहनांची खरेदी होत असते. त्यामुळे प्रत्येकजण घराच्या बाहेर पडताना आपले वाहन घेऊन निघतो. त्यामुळे रस्त्यावर येणा-या वाहनांची संख्या मोठी आहे. मात्र, शहरात पुरेशी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनचालक रिकामी जागा दिसेल तिथे वाहने पार्क करतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कोठेही वाहने उभी दिसतात. तसेच सार्वजनिक वाहन व्यवस्था हाही एक मोठा घटक यला जबाबदार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने अनेकांना स्वतःच्या वाहनांचा वापर करावा लागतो. परिणामी पार्किंगची समस्या उद्भवत आहे.
कारवाई होणार का?
शहरात वाहतूक विभागाकडून अनेकदा रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केलेली असली की, त्यावर कारवाई होते. दंड वसूल केला जातो. नियम मोडला की दंड भरावा लागतो. त्याच प्रमाणे महापालिका आणि महापालिकेच्या बाहेर आल्यावर असलेल्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने उभी असतात. त्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सामान्यांना पार्किंग मिळणार का?
महापालिकेत अनेक नागरिक कामासाठी येतात. मात्र, त्यांना आपली दुचाकी किंवा चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे काही नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागतात. परिणामी संबंधित रस्त्याने जाणा-या इतर वाहनचालकांना त्याचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेत कामानिमित्त येणारे सर्वसामान्य नागरिक, त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना सहज पार्किंगसाठी जागा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.