“मंत्र्याने सांगूनही नोकरी मिळत नसेल तर काहीतरी गडबड आहे…”

कविता राऊतच्या नोकरीवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगणार असल्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला नोकरी न देण्यासंदर्भात बोलताना त्यांनी सरकारमध्ये काही तरी गडबड असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली. नाशिकमध्ये आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कविता राऊतदेखील या कार्यक्रमात उपस्थित होती.

“कविता राऊतला आपल्या गावात राहायचं असून सेवा करायची आहे. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, पण अजून मिळालेली नाही. मंत्र्याने सांगूनही नोकरी मिळत नसेल तर काहीतरी गडबड आहे. पण मी कविताला सांगू इच्छितो की, थोडा वेळ लागेल पण नोकरी नक्की मिळेल. कारण सरकारचे येथे असे काही धंदे चालतात, काहीतरी अडचण आणत राहतात,” अशी टीका राज्यपालांनी यावेळी केली.

“आदिवासी भागात शिक्षक मिळत नसतील तसंच शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय करतंय?,” अशी विचारणादेखील यावेळी त्यांनी केली. राज्यपालांनी यावेळी आपण मुख्यमंत्री असताना शिक्षकांसाठी केलेल्या कामाची माहिती देताना राज्य सरकारशी चर्चा करु असे आश्वासन दिले.

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकारने वर्ग १ पदावर नोकरी देण्याचं आश्वासन दिले होतं. पण अद्यापही नोकरी मिळालेली नाही. यासंबंधी कविता राऊतने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटही घेतली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.