मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बँड झाल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग निवडला. दरम्यान, तेंव्हापासून ते आजपर्यंत अजित पवार गटावर टीका होताना दिसत आहे. त्यातच नुकतेच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केल्याने आता रोहित पवार यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्याने निशाणा साधत खळबळजनक दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून मोठं भाष्य केलं आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन खासगी कर्मचारी काम करू शकतात, म्हटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
दादा आपण लहान आणि नवखे आहोत अजुन राजकारणात! ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते याचा मी स्वतः साक्षीदार आहे.आता सरकारला सरकारचे काम करू द्या. आणि स्वतःला सावरा. https://t.co/fzMHzzTaME
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 12, 2023
रोहित पवारांच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेत सामील होण्यासाठी सर्वात आधी रोहित पवारांनीच समर्थन दिलं होतं, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी ट्विटर पोस्ट लिहून रोहित पवारांना उत्तर आहे.
रोहित पवारांना उद्देशून अमोल मिटकरींनी आपल्या पोस्टमध्ये, “दादा, आपण राजकारणात अजून लहान आणि नवखे आहात. ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आता सरकारला सरकारचे काम करू द्या आणि स्वतःला सावरा.” असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.