“आयएमए’ची मागणी : नोंदणीची मुदत 31 मार्च रोजी संपली
पुणे – शहरासह राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग व्यस्त आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांच्या नूतनीकरणाच्या नोंदणीची मुदत 31 मार्च रोजी संपली आहे. परिणामी, नोंदणीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे.
0मार्चपासून पुण्यासह महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या संसर्गाचे अनेक बळी ठरले आहेत. त्याला नियंत्रण आणि उपाययोजना करण्यात आरोग्य खाते सध्या व्यस्त आहे. दुसरीकडे बॉम्बे नर्सिंग ऍक्टनुसार रुग्णालयांच्या नोंदी या वेळोवेळी झाल्या पाहिजेत. त्याची साधारण 31 मार्चपर्यंत मुदत असते. करोनाच्या संसर्गामुळे अन्य कामकाज बंद आहे. शिवाय, अनेक डॉक्टर, रुग्णालये करोना रुग्णांवर उपचार करत असल्याने त्यांना या कामासाठी वेळच नाही. त्या पार्श्वभूमीवर आयएमएच्या राज्य शाखेने राज्याच्या आरोग्य खात्याचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे मुदतवाढीची मागणी केली.
नोंदणी न केल्यास रुग्णालय बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे. यावर्षी करोनाच्या साथीमुळे 25 मार्चपासून टाळेबंदी पुकारली. सरकारी कार्यालयांचे कामकाज बंद आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारीही साथरोग नियंत्रणाच्या कामात आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांची प्राथमिक तपासणी आणि उपचार करण्यात येत आहेत. काही डॉक्टर सरकारी रुग्णालयांमध्येही सेवा बजावत आहेत.
त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला विलंब झाला आहे. याचा परिणाम रुग्णालये बेकायदा ठरवण्यात होऊ नये, अशी धास्ती डॉक्टरांमध्ये आहे. त्यासाठी प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आयएमए राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केली.