नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 2826 ने वाढ झाली आहे. तर याआधी एक दिवसाअगोदर 4183 रुग्णांचा मृत्यू झाला होता. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 55 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3 लाख 46 हजार 434 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 22 लाख 99 हजार 345 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 74 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 12 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 41 लाख आहे.
जगभरात एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये आढळून आले आहेत. तर जवळपास एक तृतियांश रुग्णांचा मृत्यूही अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू ब्रिटनमध्ये झाले आहेत. ब्रिटनमध्ये 36793 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आसून एकूण 259559 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ब्रिटनमधील रुग्णांची संख्या रूस, स्पेन आणि ब्राझीलपेक्षा कमी आहे. यानंतर इटली, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, भारत यांसारख्या देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.