मंचर -साकोरे (ता. आंबेगाव) हे गाव प्रतिबंध क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घोषित करण्यात आले आहे. तसेच साकोरे गाव केंद्रस्थानी धरून पाच किलोमीटरपर्यंत बफर झोन मंगळवार (दि. 19) पासून घोषित केले आहे. त्यामुळे गावात कोणीही येऊ नये. गेल्या चार दिवसांत गावात विनाकारण फिरणाऱ्या आठ नागरिकांची वाहने जप्त करून संबंधित नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
साकोरे गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळल्याने नाकाबंदी केलेली असून संबंधित क्षेत्रांमध्ये कोणीही व्यक्ती प्रवेश करणार नाही. तसेच कोणी बाहेर जाणार नाही. संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही व विनाकारण फिरणार नाही. गावात तिराईत व्यक्ती प्रवेश करणार नाही असे आदेश दिले आहेत. याठिकाणी पोलीस जवान राजेंद्र हिले, सुदर्शन माताडे आणि पोलीस कॉन्स्टेबल कृष्णदेव पाबळे हे हजर असताना आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलीस जवान सुदर्शन माताडे यांनी फिर्याद दिली आहे.