नगर -जिल्ह्यात आज पुन्हा दोन नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील पाच-सहा दिवसांत 30 रुग्ण आढळले होते. त्यानंतर जिल्हाभरात दोन रुग्ण आढळून आल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे. तसेच 15 करोना मुक्त झालेल्यांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप 42 अहवालांची प्रतीक्षा नगरकरांना आहे.
जिल्ह्यात आज करोनाचे आणखी दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या 40 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. ही महिला बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली होती. तसेच वाशीहून (मुंबई) शेवगावमधील मिरी रोड येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. तसेच 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज 70 करोनाबाधित बूथ हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत.
करोनाबाधित 13 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. तर दोन व्यक्तींना पीएमटी लोणी येथून डिस्चार्ज देण्यात आला. घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये राहाता तालुक्यातील दोन, संगमनेर येथील सहा, कर्जत, अकोले येथील प्रत्येकी दोन, शेवगाव, नगर शहर, पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 136 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये केलेल्या तपासणीत आज 35 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 42 अहवालांची प्रतीक्षा असल्याचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी सांगितले.