परदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत विशेष दक्षता
पिंपरी – परदेशातून आलेले काही नागरिक आणि “होम क्वारंटाईन’साठी सांगितलेले नागरिक सोसायट्यांमध्ये प्रवेश करताना त्याबाबत सोसायटीतील पदाधिकारी किंवा सदस्यांना कल्पना देत नाहीत. तसेच, त्यानंतर सोसायटी आवारात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे सोसायट्यांकडून आता याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे.
परदेशातून सोसायट्यांमध्ये प्रवेश करणारे नागरिक आपण परदेशातून आल्याचे सोसायटीतील रहिवाशांपासून लपवित आहेत. अशाप्रकारे लपवाछपवी करून ते सोसायटीत प्रवेश मिळवितात. त्यानंतर त्यांना “होम क्वारंटाईन’साठी सांगितल्याचे नंतर लक्षात येते. त्यामुळे आता याबाबत सोसायट्यांमध्ये आवश्यक दक्षता घेतली जात आहे.
सोसायट्यांमध्ये परदेशातून किंवा होम क्वारंटाईनसाठी सांगितलेल्या लोकांबाबतची माहिती घेतली जात आहे. तसेच, संबंधितांना मास्क घालण्यास सांगितले जात आहे. त्याशिवाय, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केला आहे. अशा नागरिकांना लिफ्टचा वापर करू नये, असे सांगण्यात आले आहे. तसेच, घरातच राहण्याबाबत आणि सोसायटीतील अन्य नागरिकांच्या संपर्कात न येण्याबाबत सांगितले आहे.
तसेच, महापालिका वैद्यकीय विभागाला याबाबत कळवून अशा नागरिकांची वैद्यकिय तपासणी करण्यास सांगितले जात आहे. काही सोसायट्यांमध्ये तर अशा नागरिकांना प्रवेशच नाकारला जात आहे. त्यांना प्रथम वैद्यकीय तपासणी करून या, त्यानंतरच सोसायटीत प्रवेश मिळेल, अशी भूमिका घेण्यात येत आहे.