भोर(पुणे) :- अतिवृष्टीमुळे महाड-भोर मार्गावर वरंधा घाटातील रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. तसेच याठिकाणी दरडी कोसळत असून रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त स्थानिक गावकऱ्यांनाच प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे.
भोर-महाड येथील परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू असून येथील धबधब्यातून दगड-मातीसह झाडांचा मलबा कोसळत आहे. त्यामुळए नागरिकांनी सतर्क राहण्याचे भोर प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्याच महिन्यात हा रस्ता 8 महिन्याच्या कालावधी नंतर सुरु करण्यात आला होता. गेल्या वर्षी 22 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टी मुळे येथील भागात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून जनजीवन ठप्प झाले होते. आता पुन्हा त्याच परिस्थितीला येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. रस्ता खचणे, दरड कोसळणे यामुळे हा घाट धोकादायक बनला आहे. या घाटाला जवळून पर्यायी मार्ग नसल्याने वाहनचालकांची गैरसोय देखील होत आहे.