पुणे – शहरातील सक्रीय करोना बाधितांची संख्या झपाट्याने खाली येत आहे. गेल्या 24 तासांत ही संख्या पाचशेने कमी झाल्यामुळे सध्या 6 हजार 885 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, आज नव्याने 329 करोना बाधित सापडले असून, शहरातील बाधितांची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 406 वर पोहचली आहे.
करोना संसर्गामध्ये ऑक्टोबर महिना पुणेकर आणि प्रशासनासाठी काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कहर केलेल्या करोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. त्यामुळे साडेसात ते आठ हजारांवर गेलेली नमुने तपासणी संख्या तीन ते साडेतीन हजारांपर्यंत खाली आली आहे.
शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस सोडले, तर दररोज तीन हजारांपेक्षा अधिक नमुने तपासणी होते. त्यामध्ये तीनशे ते चारशेच्या जवळपास बाधित सापडत आहे. शनिवारी दिवसभरात 2,883 जणांची तपासणी करण्यात आली.
तर दिवसभरात 774 बाधित करोनामुक्त झाले आहेत. मागील दोन दिवसांत अत्यव्यस्थ बाधित संख्येतही घट झाली आहे. 685 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 366 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, तर 319 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.