fbpx

कोलकाताने घेतली दिल्लीची फिरकी

आबूधाबी – वरुण चक्रवर्ती व पॅट कमिन्स यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीवर फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात वर्चस्व राखले. चक्रवर्तीने यंदाच्या स्पर्धेत एकाच डावात पाच गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज अशी नवी ओळख निर्माण केली.

विजयासाठी 195 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. या स्पर्धेत दोन शतके फटकावणारा शिखर धवन, अजिंक्‍य रहाणे, मार्कस स्टेनिस, अक्‍सर पटेल यांनी साफ निराशा केली. तसेच ऋषभ पंतही अनावश्‍यक फटका मारून 27 धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरही 47 धावांवर बाद होत तंबूत परतला. कोलकाताकडून चक्रवर्तीने 5 तर पॅट कमिन्सने 3 गडी बाद केले.

तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजी दिली. शुभमन गिल, राहुल त्रिपाठी व दीनेश कार्तिक यांनी आपल्या विकेट गमावल्या. त्यावेळी कोलकाताच्या 3 बाद 42 अशी बिकट स्थिती निर्माण झाली होती. नितीश राणा व सुनील नरेन यांनी चौथ्या गड्यासाठी 115 धावांची भागीदारी केली. नरेन आततायी फटका मारण्याच्या प्रयत्नात 32 चेंडूत 6 चौकार व 4 षटकार अशी फटकेबाजी करून 64 धावांवर बाद झाला.

त्यानंतर नितीश राणा व कर्णधार इयान मॉर्गन यांनी अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली. दरम्यान, राणाने आपले अर्धशतकही पूर्ण केले. 20 षटकातील पाचव्या चेंडूवर तो 53 चेंडूत 13 चौकार व 1 षटकार फटकावून 81 धावांवर बाद झाला. मॉर्गनही याच षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद झाला मात्र, त्यांनी कोलकाता संघाला 20 षटकांत 6 बाद 194 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 6 बाद 194 धावा. (नितीश राणा 81, सुनील नरेन 64, इयान मॉर्गन 17, अनरिच नोर्जे 2-27, कागिसो रबाडा 2-33, मार्कस स्टोनिस 2-41). दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 9 बाद 135 धावा. (श्रेयस अय्यर 47, ऋषभ पंत 27, रवीचंद्रन अश्‍विन नाबाद 14, वरुण चक्रवर्ती 5-20, पॅट कमिन्स 3-17, लॉकी फर्ग्युसन 1-30).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.