fbpx

फलंदाजांनी गमावलं गोलंदाजांनी कमावलं! लो-स्कोरिंग सामन्यात पंजाबचा हैद्राबादवर विजय

दुबई – आयपीएलच्या या पर्वामध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना रंगला. लो-स्कोरिंग असूनही रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात अखेर पंजाबने बाजी मारली.

पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण देण्याचा कर्णधार वॉर्नरचा निर्णय योग्य ठरवत हैद्राबादच्या गोलंदाजांनी पंजाबला अवघ्या १२६ धावांमध्ये गुंडाळले. यामुळे हैद्राबादचा संघ विजय सहज प्राप्त करेल असे चित्र होते. मात्र पंजाबनेही टिच्चून गोलंदाजी केल्याने लो-स्कोरिंग सामन्यात अखेर पंजाबचाच विजय झाला.

तत्पूर्वी, निकेलस पूरन वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने किंग्ज इलेव्हन पंजाबला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केवळ 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे पंजाबला आक्रमक फलंदाजी करण्यात अपयश आले.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात पंजाबने मयंक आग्रवालला विश्रांती दिली व मनदीप सिंगला स्थान दिले. मनदीपच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले मात्र, त्याने या सामन्यात खेळण्याचे ठरवले. त्याच्या या निर्धाराचे सोशल मीडियावरही चाहत्यांनी कौतुक केले. प्रत्यक्ष सामन्यात त्याची खेळी चांगली झाली नाही.

कर्णधार लोकेश राहुलसह त्याने डावाची सुरुवात केली व 37 धावांची सलामीही दिली. मात्र, तो 17 धावांवर बाद झाला. राहुलने ख्रिस गेलच्या साथीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 20 चेंडूत 20 धावा करत गेलही बाद झाला. त्यानंतर 27 चेंडूत 27 धावांची खेळी करत राहुलही रशिद खानच्या अप्रतिम गुगलीवर त्रिफळा बाद होऊन तंबूत परतला. यंदाच्या स्पर्धेत जवळपास 11 कोटी रुपयांचा करार केलेला ग्लेन मॅक्‍सवेलची अपयशाची मालिका याही सामन्यात कायम राहिली. तो 12 धावांवर तर त्याच्या जागी आलेला दीपक हुडाही अपयशी ठरला.

निकोलस पूरनने एक बाजू लावून धरली होती. मात्र, त्यालाही आक्रमक फलंदाजी करता येत नव्हती. या संपूर्ण सामन्यात पंजाबने संथ फलंदाजी केली. पूरनला साथ देताना ख्रिस जॉर्डनने सावध फलंदाजी केली. या जोडीने 17 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. त्यानंतर जॉर्डनही बाद झाला. हैदराबादकडून रशिद खान व संदीप शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.