सातारा – गोडोली चौक ते शिवराज पेट्रोल पंप यादरम्यान रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांच्या टपऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने आज हटवण्यात आल्या. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान विक्रेते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रसंग घडले. मात्र, सर्व टपऱ्या हटवण्यात आल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
गोडोली चौक येथील अतिक्रमणांसंदर्भातील कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा नगरपालिका यांच्या घोळामध्ये अडकून पडली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम सातारा उपविभाग यांच्या माध्यमातून या कारवाईमध्ये लक्ष घालण्यात आले. लिंबखिंड ते खिंडवाडी व गोडोली चौक ते शिवराज पेट्रोल पंप यादरम्यानच्या अतिक्रमणासंदर्भामध्ये संबंधित टपरी चालकांना बांधकाम विभागाच्यावतीने नोटीसी बजावण्यात आल्या होत्या.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार असल्याने वाहतुकीला अडचणी करणाऱ्या टपऱ्यांना कारवाईचे लक्ष्य करण्यात आले. या मार्गावर अनेक लोखंडी शेड, मोठी दुकाने, पक्की बांधकामे करण्यात आली होती. संबंधितांना टपऱ्या हलवण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. 28 फेब्रुवारी रोजी ही मुदत संपत होती. त्यानुसार बांधकाम विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे 40 कर्मचारी, दोन ट्रक, जेसीबी व गोडोली पोलीस चौकीसह पोलीस फौजफाटा या कारवाईसाठी उपलब्ध होता.
काही टपरीचालकांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्या टपऱ्या हटवण्यात आल्या नाहीत. ही कारवाई सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेतीनपर्यंत सुरू होती. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असेल तर नगरपालिका कोणत्या नियमांतर्गत दंड वसूल करते, असा सवाल येथील पीडित विक्रेत्यांनी केला. या कारवाईदरम्यान विक्रेते आणि अधिकारी, कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून ही कारवाई थांबू दिली नाही. अजंठा चौक ते शिवराज पेट्रोल पंप तेथून खिंडवाडी परिसर रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला.