– मंगेश रत्नाकर
नारायणगाव -महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणे बघता जुन्नर तालुक्यात कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. तालुक्यातील महाविकास आघाडीतील पक्ष आणि भाजपा एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे कार्यकर्ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेला आदेश पाळणार का? हे बघावे लागेल.
जुन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणे बघता आघाडी व युतीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा आहे. वरिष्ठांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीने व भाजप-शिवसेना युतीने प्रत्येकी एक अधिकृत उमेदवार देण्याचे ठरवले तर कार्यकर्ते उमेदवाराला सहजासहजी स्विकारुन निवडणुकीत काम करतील, असे कुठलेही चिन्ह सध्या तरी दिसत नाही.
विधानसभेच्या 2019मधील निवडणुकीत शिवसेना गटाने शरद सोनवणे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज होऊन त्यांच्याच गटातील आशा बुचके यांनी त्यांच्या विरोधात स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यामुळे दोघांच्या भांडणात काय घडले हे सर्वश्रुत आहे. आज राज्यातील सत्तांतर नाट्या नंतर शिवसेनेत मोठी फूट पडल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत.
आज पूर्वीच्या शिवसेना गटातील शरद सोनवणे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.परंतू राज्यात या दोन्ही पक्षाची युती आहे. त्यामुळे भाजपा व एकनाथ शिंदे युतीने अधिकृत एकच उमेदवार दिल्यास एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना मदत करणार का? याउलट एकेकाळी शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीने एकत्रितपणे अधिकृत उमेदवार दिल्यास तालुक्यातील शिवसेना (उद्धव ठाकरे) किंवा राष्ट्रवादी एकमेकांना मदत करणार का? हे बघावे लागेल.
वैयक्तिक हितसंबंधासाठी…
तालुक्यातील स्थानिक राजकीय परिस्थिती बघता महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना मदत करतील असे पोषक वातावरण सध्या तरी दिसत नाही. तर भाजपा व एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे तालुक्यात फारच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातील कार्यकर्ते वरिष्ठांच्या निर्णयामुळे नाराज झाल्यास वैयक्तिक हितसंबंधाने काही कार्यकर्त्यांनी भाजपला मदत केली तर आश्चर्य वाटायला नको!
हे प्रश्न अनुत्तरीतच
सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेता जुन्नर तालुक्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अगोदर बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे जिल्ह्यातील नेते एकमेकांना कसे समजावून घेतात, आघाडी करणार का? आघाडी झाली तर समाधानी असतील का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करणार का?
यावर महाविकास आघाडीचे पुढील भवितव्य अवलंबून असेल. त्यावरच लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना मदत करायची की नाही हे ठरवतील. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये तालुक्यात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्ते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उमेदवारीसाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असतील.