Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारतासोबत अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत आले आहेत. भारत-अमेरिका द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याबरोबरच ते खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या अमेरिकेच्या भूमीवर हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतावरील आरोपांबाबतही बोलणार आहेत. व्हाईट हाऊसने याविषयीची माहिती दिली आहे.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू हा अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहतो. त्याच्याकडे कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. जरी अमेरिकेतील लोक त्याला समाजसेवक आणि वकील म्हणून ओळखत असले तरी तिथून तो भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करत असतो. पन्नू हा ‘सिख फॉर जस्टिस’ (SJF) नावाच्या खलिस्तानी संघटनेचाही प्रमुख आहे. पन्नू आणि त्याच्या संस्थेवर भारत सरकारने बंदी घातली आहे.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रधान उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फिनर यांनी भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांची भेट घेतली. फिनर यांनी 4 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे महत्त्वाकांक्षी यूएस-इंडिया इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (iCET) मधील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. दरम्यान, निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘अमेरिकेतील हत्येचा कट रचल्याबाबत भारतामार्फत तपास समिती स्थापन केल्याची माहिती फायनरला मिळाली. या प्रकरणात जबाबदार असलेल्या व्यक्तीला जबाबदार धरण्याचे महत्त्वही त्यांनी मान्य केले, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या न्याय विभागाने पन्नूच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली 52 वर्षीय भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर खटला चालवला होता. न्याय विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भारत सरकारच्या एका सरकारी कर्मचाऱ्याने निखिल गुप्ता आणि इतरांसोबत अमेरिकेच्या भूमीवर न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या वकील आणि राजकीय कार्यकर्त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला.’असे म्हणण्यात आले आहे.