पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील वाढते वायू प्रदूषण लक्षात घेत केंद्र शासनाने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमात (नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम) पुणे शहराचा समावेश केला आहे. त्या अंतर्गत पुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड आणि देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला पहिल्या टप्प्यासाठी ५०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
२०२६ पर्यंत वायू प्रदूषण २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत पुण्याला १३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, आणखी २०० कोटींचा निधी मिळणार आहे. या कार्यक्रमांची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ यांंनी नुकतीच वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. माजी नगरसेविका छाया मारणे, अश्विनी जाधव, डॉ. संदीप बुटाला, कैलास पारीख, बाळासाहेब सुराणा, दीपक पवार, मिलिंद तलाठी, गणेश शिंदे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब खंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळ म्हणाले, गेल्या काही वर्षांत शहराचे वाढते नागरीकरण, खासगी वाहनांची संख्या यामुळे वायू प्रदूषण वाढले आहे. महापालिकेच्या माध्यमातून ई-वाहनांना, प्रोत्साहन, प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासोबतच राज्य व केंद्रशासनाचाही मदत मोठया प्रमाणात होत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण कमी करायचे आहे. त्यासाठी पाणी शिंपडणारी कारंजी उभारणे, स्मशानभूमींमध्ये विद्युतदाहिन्या-गॅसदाहिन्यांची संख्या वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढविणे, वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ते सफाईच्या कामात सुधारणा आणणे, सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देणे, मेट्रोसाठी फीडर म्हणून ३०० मिडी बसची खरेदी करणे अशा प्रक्रिया सुरू आहेत.
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्राकडून १०० शहरांमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. त्या अंतर्गत वायू प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपायांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. – मुरलीधर मोहोळ, उमेदवार, भाजप-महायुती, पुणे लोकसभा मतदारसंघ