कार्ला, (प्रतिनिधी) – दिहवली, कार्ला येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा संस्कारशाळा आश्रम येथे येत्या गुरुवारी (दि.2) सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांच्या मुहूर्तावर 5 वधू होणार आहेत.
सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष असून, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता हळदी समारंभ, भोजन व सायंकाळी विवाह सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, नथनी, पैंजण, जोडवी व मनगटी घड्याळ भेट देण्यात येणार आहे. तसेच साखरपुड्याची साडी व लग्नाचा शालू, संसार उपयोगी वस्तू देखील आयोजकांकडून देण्यात येणार आहे. वधू वरांना साखरपुड्याचा व लग्नाचा पोशाख, मनगटी घड्याळ देखील देण्यात येणार आहे. सोबतच बँड पथक वाजंत्री रथ याची सुविधादेखील आयोजकांकडून करण्यात आली आहे.
विवाह सोहळा हा नियोजित मुहूर्तावर लागणार असल्याने मावळ परिसरातील नागरिकांनी या लग्न सोहळ्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे. या विवाह सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन सोहळा समितीचे अध्यक्ष अमोल भेगडे,मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे, कार्याध्यक्ष मनोज येवले, संस्थापक माजी सभापती शरद हुलावळे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोणे यांनी केले आहे.