लोणावळा, (वार्ताहर) – भरधाव वेगात जाणार्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार मार्गालगतच्या खड्ड्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळील टाकवे गावच्या हद्दीत झाला. तर दुसर्या एका अपघातात एका निष्णात मोटार रायडरचा मोटार सायकल व टेम्पोच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बबन राघु सुतार (वय 50, रा. वडगाव मावळ), आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय 10, रा. जाधववाडी, नवलाख उंबरे, मावळ) अशी कारमधील अपघातातील तर चिन्मय राहूल वैद्य (वय-20, रा. चैतन्यनगर, लोंढेवाडा, कोथरुड, पुणे) असे मोटारसायकल व टेम्पोच्या अपघातात मृत्यू झालेल्या बाईक रायडर्सचे नाव आहे.
या अपघातात मयूर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26, रा.मळवली,मावळ) कारचालक प्रविण नागू लोहार (वय 34, रा. पवळेवाडी, मावळ, सध्या रा.मळवली, मावळ), राकेश बाबासाहेब सोनवणे (वय21, रा.भाजे,मावळ) हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी मयूर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26, रा.मळवली, मावळ) याने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालक प्रविण नागू लोहार याच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबन सुतार, आर्यन भालेकर व कारचालक प्रविण लोहार यांच्या त्यांचे काही मित्र हे त्यांच्या आय-20 कारने (क्र.एमएच-14/एफएस-6578) जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून कार्ला फाटा येथून पुण्याकडे जात होते. यावेळी टाकवे गावच्या हद्दीतील कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार मार्गालगतच्या खड्ड्यात सुमारे 50 ते 100 मीटर अंतर पार करून कार खड्ड्यात कोसळून अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मोटारसायकल – टेम्पोच्या अपघातात बाईक रायडरचा मृत्यू
जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्या जवळील शिलाटणे गावच्या हद्दीतील साई समर्थ ढाब्या जवळ मोटार सायकल आणि टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात बाईक रायडर चिन्मय राहूल वैद्य (वय-20, चैतन्यनगर, लोंढेवाडा, कोथरुड, पुणे) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास झाला आहे.
याप्रकरणी मोहम्मद रफीक शेख (वय 24, विमाननगर, पुणे) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी टेम्पो चालक दत्ता तुकाराम बोडके (वय36, रा. शिवणे, मावळ) याच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.