पुणे – ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून त्यांची चौकशी देखील केली जात आहे. यातून आता ड्रग्ज प्रकरणी अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्यासह ११ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. त्यानंतर आता ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते (Dr. Praveen Devkate) यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सोमवारी रात्री पुणे पोलिसांनी कारवाई केली. आज त्यांना कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा गेले ९ महिने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यादरम्यान त्याचा ससून रुग्णालयात मुक्काम वाढवा यासाठी डॉ देवकाते यांनी कागदोपत्री प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ललित पाटीला उपचारांची गरज असल्याचे सांगत डॉ देवकाते यांनी ९ महिन्यांपासून त्याचा मुक्काम वाढवला होता. याबाबत आता अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
याआधी ड्रग्ज तस्कर ललित पाटील येरवडा कारागृहातुन ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या येरवडा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोमवारी अटक केली. डॉ. मरमाळे यांनी ललित पाटीलला ससून रुग्णालयात रेफर करण्यापूर्वी त्याचा भाऊ भूषण पाटील आणि मुख्य सुत्रधार अभिषेक बलकवडे यांच्याशी तब्बल १९ वेळा फोनवरुन संवाद साधला होता. यामुळे पळून जाण्याच्या कटात सहभागी म्हणून त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या भूषण पाटीलसह पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तसेच २८ नोव्हेंबर रोजी कारागृहातील समुपदेशक सुधारकर इंगळे याला अटक करण्यात आली. सुधाकर इंगळे याच्याकडे करण्यात आलेल्या तपास डॉ. मरसाळे यांचे नाव समोर आले. यानंतर अधिक तपास केला असता डॉ. संजय मरसाळे हे ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली होती.