मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सर्वच पक्ष एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल सुरु आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘राष्ट्रवादी’कॉंग्रेसमध्ये एकमेकांविरूद्ध सभा घेणं सुरू आहे, तरीही राष्ट्रवादी एकसंघ असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. पक्ष कसा सांभाळायचे हे संजय राऊत यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार यांच्याकडे शिकून बोध घ्यावा, असा टोला गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी अजित पवार हे आमचे नेते आहेत, असे वक्तव्य केले आहे. याबाबत पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले कि, नेतेपदाची ‘राष्ट्रवादी’ कॉंग्रेसची अंतर्गत बाब आहे. कोण कोणाचे नेते आहेत, हे पक्षानेच ठरवायचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले आणि राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये असलेले एकमेक सर्व आपलेच असल्याचे म्हणत आहेत.
तर दुसरीकडे त्यांचे एकमेकांविरूद्ध सभा घेणेही सुरू आहे. दोन्ही नेत्यांचे वक्तव्य पाहिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्व एकजुटीने चालले आहे, तसेच हे सर्व समजुतीने काम झालेले आहे, असा शिक्कामोर्तब जनतेमधून होतांना दिसत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटलेला नाही, तर तो एकसंघ आहे असे चित्र सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण केलं जातयं. पक्षात फुट पडलेली असल्यास पक्ष कसा सांभाळायचा याचा बोध संजय राऊत यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार यांच्याकडून घ्यावा असा टोलाही त्यांनी लगावला.