Jyoti Mete on Beed Loksabha Election 2024 : बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे बजरंग सोनवणे मैदानात आहेत. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे येथे कोणाला पाठिंबा देणार असा अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र शिवसंग्राम संगटना कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. आज पुण्यात शिवसंग्रामचे राज्यभरातील प्रमुख नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना ज्योती मेटे म्हणाल्या, “आमच्या राज्यकारणीची आज (दि. 27) बैठक झाली. आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे मत ऐकून घेतले. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले आहेत. उरलेल्या जागांवर मतदान होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही तटस्थ भूमिका घेणार आहोत. शिवसंग्राम संघटना कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही.”
लोकसभा लढवणार नाही –
ज्योती मेटे म्हणाल्या, आम्ही विधानसभेची जागा लढवणार आहोत. ज्यांची मदत करावी लागेल. महायुतीच्या नेत्यांना सांगायचं म्हणजे आता जाहीरपणे सांगतोय की, राजकारणात अनुषंगिक भूमिका आहे. नाराजीचा प्रश्न उद्भवत नाही. बीडची जागा लढवावी अशी जनतेची मागणी होती. मी लोकसभा लढवणार नाही. जनतेच्या हिताचा विचार करून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही आढावा घेतला.
बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे –
बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्र्वादी शरद पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे मैदानात आहेत. पंकजा मुंडे यांचे बंधू आणि मंत्री धनंजय मुंडे या निवडणुकीत त्यांच्यासोबत आहेत. तर दुसरीकडे बजरंग सोनवणेंसाठी शरद पवारांनी ताकद लावली आहे. बजरंग सोनवणे जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, बीड लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.