Narendra Modi | Pune | Lok Sabha Election 2024 – बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत्या २९ एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार आहे. या शिवाय, पंतप्रधान मोदी यांचा पुण्यात एक रोड शो आयोजित करण्यात आला आहे.
मोदी यांच्या ‘रोड शो’साठी महायुतीकडून संयुक्त तयारी करण्यात येत असून महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. वातावरण निर्मितीसाठी मोदींच्या ‘रोड शो’ चे आयोजन करण्यात येणार आहे.
बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
त्यांच्या प्रचारार्थ २९ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता रेसकोर्सच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
या सभेला भारतीय जनता पार्टीकडून ‘महाविजय संकल्प सभा’ असं नाव देण्यात आले आहे. या सभेला २ लाख पुणे जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्तिथ असणार आहेत. न भूतो न भविष्य अशी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे.
सध्या या सभेची जोरदार तयारी सुरु असून, आजपासून सगळं मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सभेला ३ हजार व्हीआयपी असणार आहेत. त्यांना वेगळे गेट असणार आहे. कोणालाही आतामध्ये येताना पाणी बाटली घेऊन येता येणार नाही.
पाण्याची सोय आतमध्ये असणार आहे. सभेच्या ठिकाणी बॅग कोणालाही घेऊन जाता येणार नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभास्थळी पोहचण्यापूर्वी १५ मिनिटे प्रवेश बंद कारण्यात येणार आहे.