नवी दिल्ली – दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एका भाजप नेत्याने महिला आंदोलकांवर बलात्कार करण्याची चिथावणी देणारे आक्षेपार्ह विधान केले आहे. ते महिलांना घाबरविण्यासाठी केलेले विधान आहे असा आक्षेप घेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 175 महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना त्या वक्तव्याच्या विरोधात एक खुले पत्र पाठवले आहे.
भाजप नेत्यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांना महिलांच्या विरोधातील अत्याचाराला चिथावणी देण्याचाच प्रकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या महिलांना धमकावण्याचाच हा प्रकार आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यातून हिंसेचे वातावरण तयार झाले आहे असा आक्षेपही या महिलांनी या पत्रात घेतला आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या महिलांमध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ देविका जैन, लैला तय्यबजी, माजी राजदूत मधू भंडारी, कमला भसीन, इत्यादींचा समावेश आहे.