नवी दिल्ली – दोन अज्ञात इसमांनी जामिया मिलिया विद्यापीठाच्या गेट नंबर 5 जवळ रविवारी रात्री उशिरा गोळीबार केल्याचा दावा जामिया समन्वय समितीने केला आहे. या समितीन जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की तेथे काही विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सीएएच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. पण त्या ठिकाणी गेट नंबर 5 वर लालरंगाच्या दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी गोळीबार केला. त्यांच्यापैकी एकाच्या अंगावरही लाल रंगाचे जाकीट घातलेले होते. त्यांच्या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
समितीने हल्लेखोरांचे वर्णन पोलिसांना दिले असून ते ज्या दुचाकीवरून आले होते त्याचा क्रमांकही त्यांनी पोलिसांना दिला आहे. त्या माहितीची पोलिस खातरजमा करीत आहेत. ही घटना रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला घडली अशी माहिती कॉंग्रेसचे ओखला भागातील माजी आमदार असिम मोहंमद खान यांनी दिली. ते म्हणाले की गेटच्या बाहेर गोळीबार होत असल्याचा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो त्यावेळी दोन हल्लेखोरांना आम्ही पाहिले. त्यानंतर आम्ही पोलिसांना याची कल्पना दिली. जामिया नगर भागात या आठवड्यात झालेली गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. दरम्यान अशा गोळीबारांनी आम्ही दबणार किंवा घाबरणार नाही असा निर्धार तेथील निदर्शकांनी व्यक्त केला आहे.