पिंपरी – पूर्वी भांडण झालेल्या मुलीसोबत खेळायला जाते म्हणून 70 वर्षीय महिलेने आपल्या नऊ वर्षीय नातीला झारा गरम करून चटके दिले. त्यात मुलीच्या पायाला, हाताला, तोंडाला इजा झाली आहे. हा धक्कादायक प्रकार 30 डिसेंबर रोजी दुपारी लांडेवाडी, भोसरी येथे घडला. याबाबत आजीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जडिता विश्वनाथ वाघमारे (वय 70, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राची उर्फ जान्हवी प्रदीप गायकवाड (वय 9) असे जखमी मुलीचे नाव आहे. याबाबत प्राचीची आई सारिका प्रदीप गायकवाड (वय 33, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. 5) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी जडिता ही फिर्यादी सारिका यांची मावस मावशी आहे. सारिका यांची मुलगी प्राची ही तिची मैत्रीण तनिष्का सोबत खेळायला जात असे.
तनिष्का सोबत आरोपी जडिता हिचे भांडण झाले होते. प्राची ही तनिष्का सोबत खेळायला जाते, याचा जडिता हिला राग येत असे. त्यावरून 30 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जडिता हिने प्राचीची मोठी बहीण साक्षीला सांगितले की, प्राचीला धरून आण. साक्षीने प्राचीला धरून आणल्यानंतर जडिता हिने गॅसवर झारा गरम करून प्राचीच्या पायाला, हाताला, तोंडाला आणि गालाला चटके देऊन जखमी केले.
याबाबत सहा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.