टीममध्ये पुण्यातील संशोधकाचा समावेश
पुणे – अंदमान-निकोबार बेटांवर “ऑर्किड’च्या दोन नवीन प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. या संशोधनात भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या (बीएसआय) संशोधकांचाही सहभाग होता. तुलनेने कमी प्रमाणात ज्ञात असलेल्या अंदमान-निकोबार बेटांवरील जैवविविधतेच्या अभ्यासासाठी हा एक महत्त्वाचा शोध मानला जातो.
सापडलेल्या नवीन प्रजाती या “ल्युइसिया’ प्रजातील असून, अनुक्रमे “ल्युइसिया डिग्लिप्युरेन्सिस’ आणि “ल्युइसिया जरावना’ असे नामकरण करण्यात आले आहे. या संशोधनात “बीएसआय’ येथील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. जीवन जलाल, संजय मिश्रा, लालजी सिंघ आणि विवेक पौलोझ हे सहभागी होते. “ल्युइसिया डिग्लिप्युरेन्सिस’ ही वनस्पती जुलै ते सप्टेंबरदरम्यान, तर “ल्युइसिया जरावना’ ही वनस्पती जून ते ऑगस्टदरम्यान आढळते.
या शोधाबाबत डॉ. जलाल म्हणाले, “या दोन्ही ऑर्किड प्रजातींची रचना आतापर्यंत आढळलेल्या ऑर्किड फुलांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. जैवविविधतेच्या दोन हॉटस्पॉटदरम्यान आढळणारी या बेटांवर अजूनही अनेक प्रकारच्या वनस्पती प्रजाती आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी याठिकाणी अजून खोलवर संशोधन करणे गरजेचे आहे.’
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमान-निकोबार बेटे येथे ऑर्किडच्या एकूण 158 प्रजाती आढळतात. त्यापैकी 23 प्रजाती या “इंडेमिक’ म्हणजेच स्थानिक स्वरुपातील प्रजाती आहेत. बेटांच्या चहुबाजूंनी असलेला समुद्र आणि याठिकाणी असणारे “एक्सट्रिम वेदर’ म्हणजेच अतिशय टोकाचे हवामान या दोन्हींचा प्रभाव येथील वनस्पतींवर होत असून, याबाबत अधिक अभ्यासाची आवश्यकता संशोधकांनी व्यक्त केली आहे.