‘परिवेश’वर नोंदणी बंधनकारक : रोगांचा संसर्ग नियंत्रणासाठी ठरणार उपयुक्त
पुणे – संशोधन, संवर्धन अथवा व्यावसायिक कार्यासाठी विदेशातून आयात केल्या जाणारी एखादी वनस्पती किंवा प्राणी यांच्यावरही आता सरकाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. विदेशी सजीव प्रजाती धारक संस्था अथवा नागरिकांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ऑनलाइन माहिती मागविली आहे. वनस्पतीजन्य अथवा प्राणीजन्य रोगांचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
विविध कारणांसाठी देशात परदेशी सजीव प्रजाती आयात केले जातात. यासाठी अभ्यासक अथवा व्यावसायिकांकडून विशेष व्यापारी अधिवेशनही भरविले जाते. मात्र, आतापर्यंत एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेकडे परदेशी सजीव प्रजाती असतील, तर त्याबाबत राज्य अथवा केंद्रस्तरावर या प्रजातींच्या उपलब्धतेबाबत कोणतीही एकत्रीत माहिती प्रणाली उपलब्ध नाही.
त्यामुळे अशा प्रजातींमुळे संसर्गजन्य रोग उद्भवल्यास त्याचे व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरते. हा धोका टाळण्यासाठी अशा प्रजाती धारकांकडून पुढील सहा महिन्यांत ऐच्छिक प्रकल्पाद्वारे साठा माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रजाती धारकांना “परिवेश’ या संकेतस्थळावर जाऊन साठा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक अर्ज भरावे लागतील. ही नोंदणी जनावरांची एकूण संख्या, संतती निर्माण, तसेच आयात व देवाणघेवाणीसाठी केली जाईल. हे प्रजातींचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यात मदत करेल आणि धारकांना योग्य पशुवैद्यकीय देखभाल, त्यांचा निवारा आणि प्रजातींचे कल्याण करण्याच्या इतर बाबींबद्दल मार्गदर्शन करेल.