मुंबई – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर कडक नियम लागू असतानाही अनेक जण अजूनही नियम सर्रास धाब्यावर बसवताना दिसत आहेत. अशा निष्काळजी पब्लिकच्याविरोधात पोलिसांनी कठोरपणे कारवाई करायला सुरुवात केली आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाललाही पोलिसांच्या या कारवाईचा दणका बसला आहे.
पंजाबमधील पटियाळा जिल्ह्यात एका सिनेमाचे शूटिंग करत असताना कोविड-19 शी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी गिप्पी ग्रेवालला अटक केली. एवढेच नव्हे तर गिप्पी ग्रेवालबरोबर अन्य सहकलाकारांनाही अटक करण्यात आली. पटियाळा जिल्ह्यातल्या राजपुरा विभागातल्या कराला गावातल्या एका शेतात गिप्पी ग्रेवालचे हे शूटिंग सुरू होते.
याबाबत समजताच पोलिसांनी धडक कारवाई करून गिप्पी आणि अन्य पब्लिकला ताब्यात घेतले. पोलिसांनी गिप्पी ग्रेवालला दंडही ठोठावला आहे. हा दंड भरल्यावर गिप्पीला सोडून दिले गेले; पण साथरोग कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर खटला भरला गेला आहे.