निवडणुकीआधीच “राजकारण’; आजी-माजी आमदारांकडून एकमेकांवर आरोप
न्हावरे – विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आमदार बाबूराव पाचर्णे यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा प्रयत्न उपस्थित कारखान्याच्या सभासदांनी हाणून पाडला, असा आरोप घोडगंगाचे अध्यक्ष माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यावर केला.
स्व. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार ऍड. अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 29) कारखाना कार्यस्थळावर पार पडली, यावेळी अशोक पवार बोलत होते. सभेच्या सुरुवातीला सर्व स्तरातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अशोक पवार म्हणाले की, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. त्याचा फटका कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद व कामगारांना बसला आहे. त्यामुळे उसाला जास्त भाव देणे अशक्य बनले आहे. तसेच कामगारांचे काही दिवसांचे पगारही थकले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी सरकारचे चुकीचे धोरण आहे. असे असतानाही कारखान्यावर सण 2018-2019 या आर्थिक वर्षात थकीत कर्ज नाही. एफआरपी देण्यासाठी शासनाकडून किमान 250 रुपये अनुदान मिळावे अशीही मागणी यावेळी अशोक पवार यांनी केली.
अशोक पवार यांनी सर्व उपस्थित सभासदांना कारखान्याविषयी जे प्रश्न आहेत ते विचारण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर काळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवी काळे, दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष सागर राजेनिंबाळकर, काका खळदकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधीर फराटे, अंकुश सोनवणे, ऍड. सुरेश पलांडे, नलगे मेजर, अमोल जगताप, सुनील जाधव, बाळासाहेब फराटे, कुंडलिक शितोळे, शिवाजीराव मचाले, शिवाजीराव कदम, शेतकरी संघटनेचे शरद गद्रे, ऍड. संपत ढमढेरे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांना कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी उत्तरे दिली. दरम्यान, काही सभासदांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांचा निषेध नोंदवला.
विषय पत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रविण शिंदे यांनी केले. सर्व विषय आवाजी पद्धतीने मंजूर करण्यात आले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान शेळके, शिरुर बाजार समितीचे उपाध्यक्ष विश्वास ढमढेरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार, माजी जि. प. सदस्य काकासाहेब कोरेकर, बाजार समितीचे संचालक राहुल गवारी, कारखान्याचे आजी-माजी संचालक, सभासद, अधिकारी व इतर सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे यांनी केले. सूत्रसंचालन मंगेश ढवळे यांनी तर बाबासाहेब फराटे यांनी आभार मानले.
आजी-माजी आमदार समर्थकांत बाचाबाची
अशोक पवार बोलत असताना, आमदार पाचर्णे समर्थक सभासदांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रतिउत्तर देण्यासाठी माजी आमदार अशोक पवार समर्थक व आमदार बाबुराव पाचर्णे समर्थक यांच्यात थोडा वेळ शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर घोडगंगाचे संचालक दिलीप मोकाशी, बाबासाहेब फराटे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, श्रीनिवास घाडगे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे यांनी शिष्टाई केल्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली.
घोडगंगाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी प्रास्ताविक खूप चांगले केले; परंतु ते सभासदांची दिशाभूल करीत आहेत.
-बाबूराव पाचर्णे, आमदार शिरूर-हवेली