शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी शाळेच्या गैरकारभाराच्या चौकशीबाबत अधिवेशनात मुद्दा मांडल्याने वाबळेवाडी ग्रामस्थ व महिलांनी आमदार अशोक पवार यांच्याबाबत सभा घेत निषेध नोंदवून आमदार यांना वाबळेवाडी गावबंदी करण्याचा निर्णय घेऊन गावात दिसल्यास काळे फासण्याचा इशारा दिला होता. आमदार अशोक पवार यांनी थेट वाबळेवाडीत जाऊन एका कुटुंबीयांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
शिक्रापूर येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेबाबत आमदार पवार यांनी अधिवेशनात मुद्दा मांडल्याने वाबळेवाडी ग्रामस्थ व महिलांनी शाळेमध्ये पालक सभा घेऊन आमदार पवार यांच्याबाबत बेताल वक्तव्य करुन काही ठराविक ग्रामस्थांनी महिलांना पुढे करीत आमदार पवार यांच्याबाबत निंदनीय वक्तव्य करायला लावले होते. यावेळी वाबळेवाडीकरांनी आमदार पवार यांना गावबंदी केल्याचे जाहीर केले.
काही महिलांनी पवार हे गावात आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता. वाबळेवाडीतील प्रसिद्ध शेतकरी देविदास वाबळे यांच्या मातेचे निधन झाल्याने आमदार पवार यांनी देविदास वाबळे व काळूराम वाबळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
यावेळी देविदास वाबळे, रघुनाथ वाबळे, काळूराम वाबळे, पमा सोनवणे, सुभद्राबाई वाबळे, ललिता वाबळे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, माजी सरपंच संभाजी भुजबळ, उद्योजक अमीत राऊत, रघुनाथ वाबळे, तेजस वाबळे, अभिषेक वाबळे, चंद्रकांत वाबळे आदी उपस्थित होते.