भाजपकडून पाचर्णे, राष्ट्रवादीकडून पवार, मनसेकडून नरके तर कंद यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिक्रापूर – महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच पक्षांकडून उमेदवार जवळपास जाहीर करण्यात आले आहेत. शिरूर-हवेलीतील यंदाची ही लढत चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिरूर हवेलीची सध्याची विधानसभेची जागा भाजपच्या ताब्यात असून भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांची उमेदवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान हवेली येथे जाहीर केली. तर राष्ट्रवादीची उमेदवारी माजी आमदार अशोक पवार यांना मिळाली असल्याचे काही वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले. त्यामुळे शिरूर-हवेलीतील मुख्य लढत आमदार बाबुराव पाचर्णे व माजी आमदार अशोक पवार यांच्यात होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे; मात्र आमदार पाचर्णे व त्यांचे कार्यकर्ते हे सध्या देशात आणि राज्यात युतीचे सरकार असून मीच पुन्हा आमदार होणार असल्याचे सांगत आहेत. तर माजी आमदार व त्यांचे कार्यकर्ते हे सत्ताधाऱ्यांच्या त्रासाला जनता कंटाळली असून आता परिवर्तन होत मी आमदार होणार असल्याचे सांगत आहे. दोघांनीही विधानसभेची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे.
दोघांनीही प्रचार सुरु केला असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी देखील त्यांचा स्वतंत्र प्रचार सुरु केलेला आहे. प्रदीप कंद यांनी हवेली सोबतच शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला संपर्क वाढविला असून हवेलीतील कार्यकर्ते देखील आमच्याच भागाला उमेदवारी पाहिजे, अशी मागणी करीत आहेत. प्रदीप कंद हे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार असल्याचे बोलत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील सर्व जागा लढविण्याचे जाहीर केलेले असताना शिरूर-हवेली अध्यक्ष कैलास नरके यांना उमेदवारी लढविण्याचे सुतोवाच दिले आहेत. वरिष्ठांकडून माझी उमेदवारी पक्की असल्याचे कैलास नरके बोलत आहेत. त्यामुळे शिरूर हवेलीतून आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार यांच्यात मुख्य व सरळ लढत होणार असली तरी देखील प्रदीप कंद व कैलास नरके हे देखील उमेदवारी लढविणार असल्यामुळे सध्या तरी शिरूर-हवेलीतून चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
अशोक पवार यांच्याकडून प्रचार सुरू
शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच सणसवाडी येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेत त्यांच्या कार्याचा लेखाजोखा जाहीर केला तर शिक्रापूर येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करत एक प्रकारे प्रचाराचा शुभारंभच केला आहे.
प्रदीप कंद काय निर्णय घेतात?
माजी आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादीकडून प्रचार सुरू केला असताना देखील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे देखील प्रचारात उतरले आहेत. त्यांचे कार्यकर्ते आता “आमचं ठरलंय, आमदार हवेलीतूनच!’ अशा प्रकारे बोलत प्रचारात असून प्रदीप कंद हे आजही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेत आहेत. मात्र उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविणार असल्यामुळे प्रदीप कंद नक्की काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.